संस्कृती : जी स्वतःची सर्वश्रेष्ठ आणि दुसऱ्यांची निंदनीय असते

मध्यमवर्गीय माणूस, ह्या प्राण्याचे प्रमाण भारतात सर्वात जास्त, सर्वात जास्त टॅक्स भरणारा,सर्वात मोठी वोट बँक असणारा,सर्व नियम अटी लागू होणारा, सर्वात जास्त इज्जत प्यारी असणारा, सर्वात जास्त धार्मिक,भोळा भाबडा ज्याला वेळ येईल तसे देशातील सरकार किंवा श्रीमंत वरील कोणतीही गोष्ट लादून त्यांची कामे काढून घेतात, ह्या प्राण्याला आणि त्याच्या मुलं बाळांना सर्वच नियम लागू होतात अगदी कपडे घालण्यापासून, एवढे सगळे नियम असतानाही संस्कृतीचा फोल माज त्याचा काही उतरत नाही, आणि ती जपायची सर्वात मोठी मक्तेदारी ह्याने घेतलेली असते, त्यात राजकारणी,संघ संघटना धर्म जातीचं विष कालवून एखादवेळी दंगलीहि घडवून आणतात,ह्यात मारली जाणारी किंवा गुन्हे करणारी पोरही ह्यांचीच पण ह्यांना तो ह्यांची संस्कृती जपल्याचा एक पराक्रम वाटतो. जाऊद्या मूळ विषयाला हात घालू...

                                                      लहान असताना किंवा अजूनही हॉलिवूड चित्रपट घरी लागला कि अनेक गोष्टीमुळे घरच्या बरोबर बघायला एक वेगळेच दडपण यायचे, तरी ज्या काळात आपण अतिगोड आणि श्रीमंतांच्या घरच्या लोव्हस्टोर्या पाहण्यात गुंग होऊन आपले डोके बाजूला ठेवून एन्जॉय करायचो, त्याकाळी हॉलिवूड गॉडझिला,अनाकोंडा,किंग कोन्ग, जुरासिक पार्क,मॅट्रिक्स,टर्मिनेटर सारखे पिक्चर दाखवून लोकांसमोर अनपेक्षित गोष्टी समोर ठेवत होते,असे म्हणतात चित्रपट हा त्या त्या देशातील समाज,संस्कृती ह्यांचे प्रतिबिंब असतो त्यावरूनच तिथल्या लोकांची त्यांच्या स्वभाव वैशीठ्याची जाण होत असते, त्यामुळं आपल्या आणि त्यांच्या चित्रपटांमध्ये जमीन अस्मानाचा फरक त्यावेळी जाणवायचा,

आणि त्यांचा चित्रपट पाहताना एकदा तरी आपल्या संस्कृतीला नशोभणारे दृश्य त्यात दिसायचे आणि आपण शरमेने लाल व्हायचो, तेवढ्यात घरातलं कोणतीतरी मोठं साथीला असेल तर आपसूकच मागून आवाज यायचा, "काय हे लोक, अजिबात लाज नाही ह्यांना,काय ह्यांची संस्कृती, काहीच मर्यादा नाहीत ह्यांना", आपली संस्कृती जगात सर्व श्रेष्ठ आहे,आपल्या घरातल्या मुली बायका बघा कधी डोक्यावरचा पदर सरकू देत नाही कि ओढणी खाली पडू देत नाही"

तेव्हा ह्या गोष्टी कदाचित प्रत्येकाला पटायच्या,मग हळू हळू समजू लागलं संस्कृती सांभाळायचं सर्वात मोठं ओझं हे मध्यमवर्गीय स्त्रियांवर आहे,पुरुष मात्र काहीही करू शकतात,त्यात संस्कृती किंवा धर्माची,देवाची चिकित्सा करणे हा आपल्याकडे अक्षम्य गुन्हा. 

पण जस जसे समजू लागते तेव्हा अनेक प्रश्न पडतात कि त्यांची संस्कृती एवढी वाईट तर आपली लोक बाहेरदेशी एवढी फिरायला किंवा राहायला का जातात,किंवा त्यांच्याकडे विज्ञान तंत्रज्ञान इतके पुढे का आहे ,किंवा त्यांच्याकडील पुरुष स्त्रिया इतक्या बिंदास कशा वावरतात,देवाची पूजा तर तेही करतात पण त्यांच्या धार्मिक स्थळी कपड्याची किंवा इतर बंधने का नाहीत? किंवा आपल्या लोकांना त्यांच्या देशाबद्दल एवढे क्रेज का आहे, पण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं हि एकंच गोष्ट आहे ते म्हणजे *"स्वातंत्र्य"* मग ते सर्वच गोष्टींचे अगदी विचार,कपडे,नाती,धर्मांतर सर्वच.  इतिहास त्यांनाही आहे संस्कृती त्यांनाही आहे आणि त्यांनी अजूनही ती खूप चांगल्या प्रकारे जतन केली आणि त्यांची अनेक शहर आणि ऐतिहासिक वास्तू पाहून आपल्याला ते समजते, पण त्यांनी संस्कृती किंवा धर्माला अवास्तव महत्व न देता पुराणातील वांगी पुराणातच ठेवली, वाईट रूढींचा,परंपरांचा त्याग करून आणि वेळेला दुसऱ्या संस्कृतींचा अभ्यास करून त्यातील चांगल्या गोष्टीही मोठ्या मनाने स्वीकारल्या, 

शेवटी अंगावर काय कापड आहेत ह्यापेक्षा विचार आणि नजर किती स्वच्छ आहे हे महत्वाचे, देवावर कितीहि श्रद्धा ठेवा पण विज्ञानाचे,शिक्षनाचे महत्वहि माहित असायला हवे,घरातील स्त्रियांना दडपून त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यापेक्षा नजरेतील स्वच्छता अधिक महत्वाची, चिकित्सा हि व्हायलाच हवी.  कोणतीही संस्कृती हि स्वातंत्र्यापेक्षा मोठी नाही कारण आचार विचारांचे,चिकित्सेचे स्वातंत्र्य असेन तरच माणसाच्या डोक्यात भन्नाट कल्पना येऊ शकतील आणि त्यावर संशोधन होऊ शकेन,लग्न किंवा धर्म जपणे हि सार्वजनिक किंवा जबरदस्तीच्या बाबी न राहता त्या वैयक्तिक झालाय तर आपोआपच त्याचे महत्व कमी होऊन आपण पाश्चत्य देशाप्रमाणे प्रगतीच्या वाटेवर जाऊ.

आपली नवी पिढी काळानुसार बदलू पाहतेय,सांगताना वाईट वाटते पण आपली आई वडील ,आज्जी आजोबांच्या काळातील पिढी अजूनही ह्यातील काही गोष्टींना इतक्या दिवस कवटाळून बसली. त्याचाही तोटा आज सहन करावा लागतोय ,एक मात्र समजले आदर हा वयाचा,आणि चांगल्या गोष्टींचा व्हायला हवा, नाहीतर दाढी-केस जरी रवींद्रनाथ टागोरांप्रमाणे कितीही वाढवले तरी त्यांची प्रतिभा येणे अशक्यच.

आजच्या परीस्थितीवरून एक समजते आजचे हि भोग हे वेळीच आवश्यक गोष्टींचा आपण कधीच पाठपुरावा केला नाही किंवा ह्या राजकारण्यांना प्रश्न विचारले नाहीत, आज स्वातंत्र्य मिळून आपल्याला जवळ जवळ ७४ वर्ष होतील पण इंग्रज जे बांधून किंवा सोडून गेले होते त्यातीलच बऱ्याच गोष्टींवर आपण भागवत आहोत, ह्याचे कारणही हा धर्मांध आणि संस्कृती प्रिय मध्यमवर्ग,दरवेळी कोणीतरी नवा राजकारणी आला आणि आपल्याला ह्याच गोष्टींत गुरफटवून गेला, पण ह्या राजकारण्यांनी-श्रीमंतांनी स्वतःच्या पिढयांना मात्र दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळवून स्थायिक करवून दिले.आपला देश आपल्याला बदलायचा असेन तर सर्वात पहिले हे पोकळ संस्कृतीचे फुगे फोडावे लागतील आणि काळानुसार बदलून इतरांच्या पावलावर पाऊल ठेवून योग्य दिशेने जावे लागेल. पटलं तर बघा..! धन्यवाद 


-विशाल यशवंत फटांगरे 

 #तथ्य_मराठी


Comments

Popular posts from this blog

माणूस खरंच पृथ्वीवर उपरा आहे का?

तिजा तेरा रंग था मै जो।