एन्डगेम

 


लॉकडाऊन पूर्वी ऑफिस,घर, घरातील इतर कामे,गावी जाणे अशा अनेक गोष्टींमध्ये अडकून गेलो होतो, खरतर ऑफिस मधेच आयुष्यातले अर्ध्या च्या वर दिवस गेले सकाळी १० वाजता पोहोचले कि संध्याकाळी कधी ७ तर कधी ११ वाजायचे त्यामुळं विकेंड म्हणजे पेरोल वर जेल मधून कैद्याची झालेली सुटकाच... मग विकेंड घरच्यांचा असे,तोही निघून जाई मला आवडणाऱ्या गोष्टी मी हळू हळू करायच्या बंद केल्या कारण न मिळणारा वेळच होता, त्यातली आवडती गोष्ट म्हणजे फँटसि चित्रपट आणि त्यातल्या त्यात मार्वल युनिव्हर्स म्हणा किंवा अव्हेंजर्स माझी आवडती सिरीज,पहिले सर्व चित्रपट मी आवर्जून मल्टिप्लेक्स मध्ये पाहिले पण नंतरचे काही भाग सुटून गेले त्यातला हा शेवटचा "अव्हेंजर्स इंडगेम",ह्या लॉकडाऊन मुळे हे सर्व भाग पाहण्याची सुवर्णसंधी चालून आली, आणि पहिलाच चित्रपट मी हाच लावला,उत्साहाने मी चित्रपट सुरु तर केला पण इतर मार्वल चित्रपटांपेक्षा मजा मस्ती किंवा म्युझिक नककीच ह्या चित्रपटाचे नव्हते किंवा कदाचित मला वाटले नसावे,चित्रपटातही मला आताच्या सारखीच भयाण शांतताच जाणवली,
 

चित्रपटात अव्हेंजर्सने पृथ्वीला थॅनॉसच्या कहरापासून वाचवले खरे पण त्यांच्या हाती आलेले जग पहिल्यासारखे राहिलेच नाही, प्रत्येक घरासमोर गोळा झालेला झाडांचा पालापाचोळा, ओस पडलेलं शहर, आप्तांना जवळच्यांना गमावून बसलेले सामान्य माणसं ते अव्हेंजर्स सर्व सारखेच वाटत होते, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची हतबलता अव्हेंजर्स फॅन ला नक्कीच हेलावून टाकणारी..., त्यात कायम उत्साही असणारा टोनी स्टार्क बहुतेक सर्वांचाच आवडता पहिल्यांदा सर्वच गमावले म्हणून हत्यार टाकून छोट्याशा घरात कुटुंबाबरोबर कायमचा लांब निघून गेलाय, नताशा परिस्थितीला जमवून घेण्याचा प्रयत्न करतेय पण डोळ्यातून येणारे पाणी ती किती खचली ते दाखवते,एरवी कॅप्टन सर्वाना आपल्या जोशीला भाषणाने जिंकून घेत असतो पण आता वर वर तो स्ट्रॉंग जरी वाटत असला तरी आतून खचत चाललाय हे जाणवते, थॉर मानवाचा देव आसगार्डचा राजा संपूर्ण राज्य जवळची माणसं आणि आता पृथ्वीहि गमावून इतका मानसिक रित्या थकून गेलाय कि तो व्यसनाधीन होऊन स्वतःच मन बळच दुसऱ्या गोष्टींमध्ये रमवू पाहतोय, शहरातील लोकं दगडांवर लावलेल्या नावांमध्ये स्वतःच्या जवळच्या माणसांची नाव शोधताय जेणेकरून ती आहेत कि गेलीत हे समजेन, हे सर्व जरी असंले चित्रपटाकडे एक खूप मोठी स्वतःची बाजू असते ती म्हणजे त्याचा शेवट, मग चित्रपट बॉलीवूड असू देत किंवा हॉलिवूड शेवटी हैप्पी एंडिंग तर असणारच आणि ती असायलाच हवी कारण तीच तर आपल्या सारख्या सामान्य माणसांना थोडी का होईना एक नवीन उम्मीद देत असते. ह्या चित्रपटाच्याही शेवटी सर्वाना सर्व मिळतातच पण आपण लाडक्या टोनी स्टार्क ला आपन कायमचे गमावतो.
आज लॉकडाऊन सुरु होऊन बरेच दिवस उलटले सुरुवातीला वर्क फ्रॉम होम किंवा इतक्या दिवस मिळणाऱ्या सुट्या ह्याचा परिस्तितीचे गांभीर्य माहीत असूनही आतल्या आत थोडासा का होईना आनंद झाला होता,सुरुवातीला चित्रपट पाहताना, netflix ,ऍमेझॉन च्या सिरीज पाहताना मन रमले पण आता १५ मिनिटाच्या वर काहीही बघितले जात नाही, सुरुवातीला बातम्या थोड्या का होईना इंटरेस्ट ने पाहिल्या जायच्या पण आता वाढते रुग्ण आणि मृत्यूचे आकडे बघून त्याही बघायची भीती वाटू लागलीय,कदाचित सत्यपरिस्थितीला सामोरे जाण्याची मनाची तयारी हळू हळू कमी होत चाललीय, इतक्या दिवस घरी निवांत बसायला मिळावे म्हणून प्रयत्न करत होतो आज तेच दिवस मिळाले तर कोंडमारा होतोय, पूर्वी चार्ली, टॉम अँड जेरी बघून मनापासून हसू यायचे आता सर्वात मोठा जोक माणसाबरोबर झालाय हे कळतेय, कामाच्या व्यापात किंवा कोणत्याही कारणाने दूर गेलेले सगळेच एकमेकांना फोन करताय व्हिडीओ कॉल करताय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू जरी दिसत असले तरी मनातली भीती आणि डोळ्यातली एकमेकांबद्दलची काळजी दिसू लागलीय कीतीही विषय बदलण्याचा प्रयत्न केला तरी सध्याची परिस्तिथी डोक्यात चिकटून बसलीय, ह्या संसर्गामुळं शारीरिक आरोग्य धोक्यात आलंच आहे पण मानसिक तणाव प्रत्येकाच्या मनात आपण कुणालाही न सांगता भोगत आहोत, छंद जो पर्यंत स्वतःला आनंद देतात तोपर्यंतच हवे हवेसे वाटतात पण जेव्हा आतून माणूस दुखी होतो तेव्हा तेही साथ सोडतात,जुने म्हणजेच अगदी जुने दिवस नाहीत पण ते जरी आठवले तरी आजच्या परिस्थितीवर विश्वास बसत नाही, फक्त १२ -१५ दिवसातच त्याधीचे दिवस खूपच जुने होते असं वाटू लागलंय, हे दिवस कदाचित सम्पतीलही पण ह्यानंतरचे जग आपल्या सर्वांसाठीच नवे असू शकते. 
आजारातून बरे झालेले किंवा वाचलेले अशा सर्वांचीच वैचारिक पातळी पूर्वी सारखीच राहील का? कदाचित नाही कारण ह्या आजाराने आपल्या विचार करण्याच्या जगण्याच्या व्याख्या नक्कीच दुरुस्त केल्या असे मला वाटते. पृथ्वीवरील इतर प्राणिमात्रांना तुच्छ लेखण्याचा माणसाचा स्वभाव बदलणार नाही पण त्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही,आयुष्यभर सर्कशीत,प्राणिसंग्रहालयात मरणयातनेत सम्पूर्ण आयुष्य कसे जात असेल ह्याची जाणीव आपल्याला महिन्याच्या lockdown मध्ये नक्कीच झाली,आज अनेक ठिकाणी स्वच्छ निरभ आकाश दिसतेय रात्रीच चांदणं शहरातही दिसतंय ह्यावरून आपण निसर्गाची किती वाट लावली, वायू प्रदूषण कोणत्या टोकाला गेले होते हे समजतेय, एरवी चिमण्या हरवल्या किंवा सम्पन्यात जमा आहेत अशा अनेक बातम्या यायच्या पण आज खिडकीवर,तारांवर किंवा झाडांवर त्याचा पुन्हा चिवचिवाट ऐकू येतोय, रात्री ९ प्रयत्न तर सर्वच शांत होऊन रातकिड्यांची किरकिर सुरु होतेय. 
लहानपणी परिसर अभ्यासात अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा का सांगितल्या होत्या ह्याची राहून राहून आठवण होईल, जिभेचे चोचले न पुरवता किंवा माणसाला लागलेली तंबाखू, दारू, सिगारेट सारखी व्यसन न करताही तो जिवन्त राहू शकतो, पिझ्झा,बर्गर अशा अनेक गोष्टी,मॉल,थिएटर अशा अनेक गोष्टी ज्या lifestyle आणि नंतर गरजा झाल्यात हा माणसाचा झालेला भ्रम नक्कीच तुटेल, उच्चराहणी,खर्चिक पणा अशा आणीबाणीच्या काळात किती महागात पडू शकतो हे हि समजेल, माणूस चड्डी आणि बनियनवरही दिवसभर राहू शकतो हे सध्या वर्क फ्रॉम होम करणार्यांना समजले असेल. वर्क वरून आठवलं बाहेर जाऊन नोकरी करणे म्हणजेच संसाराला हातभार लावणे असे नाही तर घरात चोवीस तास बिनपगारी आयुष्यभर नोकरी करणाऱ्या आई बायकोची होणारी धावपळ दिसेल. 
सध्या पडललेया शेअर मार्केट मुळे, शहरात घेतलेल्या फ्लॅट मुळे, गावाकडे साध्या घरात राहणाऱ्या लोकांना आनंदी बघून इन्व्हेस्टमेंट पैशाची केली कि त्यामुळं येणारया तणावाची ह्याची जाणीव होईल.कदाचित काही दिवसांनी बाहेर पडू तेव्हा काही ओळखीचे दिसतील कदाचित काही नसतील. रोजची तोंड ओळख असणारे हि किती महत्वाचे आहेत ते हि समजेल, कदाचित ज्यांना गावाकडे घर आहे ते काही वर्षांनी कायमचे गावाकडेच राहण्याचा विचार करतील. आपण सर्व मेंढरं कोणत्या न जिंकणाऱ्या शर्यतीत पळत होतो जी शर्यत निसर्गाने एका चुटकीत थांबवली... हा विचार करून स्वतःवर हसू आल्याशिवाय राहणार नाही. 
ह्याआधी देवावरून,मंदिर ,मशिदी वरून अनेक दंगली झाल्या भांडण झाली, धर्मश्रेष्ठतेची चढाओढ झाली, सर्वांची जात काढून झाली, काहींना हात लावू दिला नाही तर काहींना तुच्छ समजले गेले काही स्वतःला श्रेष्ठ समजून भविष्य भाकीत गेले. आज सर्वच एका रांगेत आहेत कोणावर वेळ येईल सांगता येणार नाही, आज आजरी पडल्यावर समोर असणारा डॉक्टर खान आहे कि गायकवाड आहे हे कुणीच विचारणार नाही पण त्याच्यात देव मात्र प्रत्येकाला दिसेल,
नागबली,मंगळाची पूजा, शांत्या,लग्न जमत नाही म्हणून पूजा,जमले म्हणून मुहूर्त,मेल्यावरचे कार्य ह्या गोष्टी किती खोट्या आहेत हे हि समजेल,आज अनेकांची सध्या मुहूर्त निघालेली लग्न थांबली आणि कोरोना ने मृत झालेल्याचे जिवाच्या भीतीने कुणी कार्य करण्यास तयार नाही, एरवी मृत्यू संस्काराच्या प्रत्येकाच्या धार्मिक पद्धती काटेकोर पणे पाळणारे आपण आज कोरोनाने मृत झालेल्याना पुरताना विना आक्षेप बघतोय ह्यावरून आपण किती धर्माध किंवा दुसऱ्याचा धर्मद्वेष करत होतो हे सिद्ध होतेय. पण ह्या सर्वांपेक्षा मूलभूत सुविधा किती महत्वाच्या असतात ह्याची नक्कीच जाणीव होईल, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत आणि तेच सर्वोच्च आहेत ह्याचीही जाणीव होईल.अनेकजण सोडून जातील अनेकजण नव्याने भेटतील पण माणूस म्हणून ह्या स्थितीतून आपण सर्वानीच धडा आणि शिकवण घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या आजूबाजूच्या सर्वच गोष्टींची जाण प्रत्येकाने नक्कीच ठेवली पाहिजे.

कदाचित माणूस म्हणून स्वतःला दुरुस्त करण्यासाठी आपल्यलाला मिळालेला हा वेळ आहे, नाहीतर पुन्हा एकदा केलेला उतमात हा आपला एन्डगेम नक्कीच असू शकतो.

-विशाल यशवन्त फटांगरे
#तथ्य_मराठी २३ एप्रिल २०२०


Comments

Popular posts from this blog

माणूस खरंच पृथ्वीवर उपरा आहे का?

ll निःशेष ll