दसऱ्याची आठवण
मागच्या दसऱ्याला माझ्या वकील मित्राने त्यादिवशी जिंकलेली केस सांगितली तीच सांगतोय...
काही वर्षांपूर्वी वकिलाच्या एका मित्राने प्रेमविवाह केला,मुलगीही सुंदर सुशील चांगली होती त्यामुळं घरच्यांनीही लगेच होकार दिला पण लग्नाच्या संध्याकाळीच मुलीचे काही अज्ञातांनी अपहरण केले,मुली मुलाच्या घरचे अत्यंत चिंतेत होते,अपहरण करूनही खंडणी किंवा इतर काही मागणीचा साधा फोनही त्यांना आला नाही त्यामुळं प्रत्येकाच्या मनात एका वेगळ्याच भीतीने घर केले,संध्याकाळ पर्यंत कसे बसे मित्र वकिलाच्या सांगण्यावरून त्यांनी वाट पाहिली पण नंतर ते पोलिसात तक्रार करण्यासाठी गेले पोलिसांनी तक्रार फक्त लिहून घेतली आणि माहिती भेटल्यास सांगतो असं बोलून काम संपवलं,वकिलाला समजून चुकलं काहीतरी दिल्या घेतल्या शिवाय चौकशी पुढं सरकणार नाही,वकिलाचा मित्र प्रामाणिक असल्याने तो बरेच दिवस चौकीत खेटे घालत राहिला पण थंड पोलीस यंत्रणा झोपलेलीच राहिली शेवटी पैशाची तजबीज करून चौकशी सुरू केली.अचानक... एक दिवस वकिलाच्या मित्राचा मोबाईल वाजला आणि समोरून त्याची पत्नी बोलत होती,तिने जो प्रकार सांगितले ते ऐकून मित्राला धक्काच बसला,तिने सांगितल्या प्रमाणे ज्याने तिचे अपहरण केले तो मुलगा तिला पाहण्यासाठी आला होता,दिसायला सुंदर ,मोठ्या कॉलेज मधून पासआउट चांगल्या पगाराची नोकरी असणारा चांगल्या घरातील चांगला मुलगा होता तो,पण तरीही मुलीने दिलेला नकार त्याला पचवता आला नाही.. त्याला मुलगी पसंत होती आणि त्यातच तो एकतर्फी प्रेमात तो पडला होता,
हे जेव्हा वकिलाच्या मित्राला समजले तेव्हा त्याने त्याच्या कुटुंबाचा पत्ता काढला आणि पोलिसात तक्रार केली,त्याच्या कुटुंबाला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्या बहिणीला भावला सगळ्यांनाच थर्ड डिग्रीचा वापर केला गेला,भावाने तोंड उघडले आणि पत्ता सापडला लगेच पोलिसांनी धाड टाकून गुन्हेगाराला पकडले मुलगीही सापडली...
सुदैवाने सगळे चांगले झाले पण थोड्याच दिवसात मित्र आणि पत्नीत वादाची कुजबुज ऐकू आली,मित्राच्या घरच्यांनी बळजबरीने तिची कौमार्य चाचणी हॉस्पिटलमध्ये करवून घेतली ते ही मित्राच्या सांगण्यावरून,तरीही त्याची पत्नी निमुटपणे सर्व ऐकत राहिली,वकीलाला हे पटलेही नाही पण खाजगी गोष्टीत तो बोलू शकला नाही,एखादं वर्षा नंतर त्यांना दोन गोंडस जुळी मूलही जन्माला आली पण घरातील वातावरण त्या जुन्या प्रसंगामुळे कायमचे गंभीर होऊन बसले,मित्रात आणि बायको एकमेकांसमोर दाखवत नसले तरी आतून मित्राचे मन कोणत्यातरी गोष्टी मूळ खात होते,नंतर समजले की आजूबाजूला राहणारी माणसं अजूनही जुन्या घडलेल्या गोष्टींमुळे मित्राच्या पत्नीला संशयी नजरेने बघतो,काहीजन असंही बोलतात की ती स्वतःच पळून गेली होती,तसा त्याची पत्नी दुर्लक्ष करत होती कारण तिला तिचा नवरा आणि कुटुंब सोडून दुसरं काही प्रिय नव्हते,पण नवरा मात्र संशयांच्या भुंग्याने त्रस्त होता,शेवटी एक दिवस वाद चव्हाट्यावर आला आणि मित्राने पत्नी समोर सगळी आग ओकली,तुला जर तो मुलगा आवडला होता तर का माझ्याशी लग्न केले?की प्रेमविवाहाचा दबाव होता? का माझं आयुष्य खराब केले? रागाच्या भरात तो खुप काही बोलून गेला,तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मोकळा झाला... हे ऐकून त्याची पत्नी आतल्या आत खचून गेली आणि काही न बोलता आपल्या मुलांना घेऊन घराबाहेर पडली,तीच केस वकील दसऱ्याच्या दिवशी जिंकला होता ते ही मित्राच्या विरोधात आणि त्याच्या पत्नीला हक्क मिळवून देण्यासाठी.
केसचा निकाल देण्याआधी त्याची पत्नी शेवटचं वाक्य बोलली त्यामुलाने १४दिवस मला एका खोलीत ठेवले वेळेवर जेवण दिले आणि फक्त विचारत राहिला माझी मंजुरी घायचा मन जिंकायचा प्रयत्न तो करत राहिला पण त्याची नजर एकदाही दूषित झाली नाही,त्या १४दिवसात मला इतका त्रास झाला नाही तितकं रोजच मरण माझ्या वाट्याला येत होतं जेव्हा माझा पती संशयी नजरेने माझ्याकडे पाहत असे,मी केस जिंकली पण मी एकत्र राहू इच्छित नाही आज मी माझ्या पायावर उभी आहे आणि माझ्या दोन्ही मुलांचं संगोपन करू शकते.
*गोष्टी सारख्याच असतात फक्त डोक्यातला दृष्टीकोन बदलणे महत्वाचे असते*
-विशाल यशवंत फटांगरे
Comments
Post a Comment